दोन दिवस गैरसोय झाली अन् राज्यातील मराठा समाज पेटला, तिसऱ्या दिवशी राज्यातून मदतीचा महापूर, ट्रकच्या ट्रक भरून अन्न पाठवलं…

मुंबई : सध्या मुंबईत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मुंबईत दाखल होत आहे. यामुळे लवकरच तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.

सरकार पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर अजूनही विचार सुरू असला तरी कोणताही ठोस पर्याय काढण्यात आलेला नाही. यामुळे समाज आक्रमक झाला आहे. मुंबईत मराठा समाजाला मुद्दाम त्रास दिला जात आहे. हॉटेल, दुकाने बंद करण्यात आली आहेत. स्वच्छतागृह बंद करण्यात आली आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाण्याचा सुद्धा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईमधील आंदोलनाची धग आणखी वाढत जाणार आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी राज्यपालातून मराठ्यांची मुंबईकडे कूच सुरूच आहे. पहिल्या दोन दिवशी अन्न पाणी कमी मिळाल्याने मदत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

मराठा आंदोलकांसाठी मदतीचा ओघ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्या दिवशी मराठ्यांची आझाद मैदान परिसरातील खाण्यापिण्याची दुकाने बंद ठेवून रसद तोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यभरातून संतापाचा उद्रेक झाला. यामुळे आता ट्रकच्या ट्रक भरून अन्न पाठवले जात आहे. राज्यभरातून भाकरी ठेचा आणि चिवडा जमा करून मुंबईला पाठवून देण्यात येत आहे.
सर्व स्तरातून ही मदत आता मुंबईकडे रवाना केली जात आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाकरी मुंबईमध्ये आंदोलकांसाठी येत आहेत. बंद पॅकेट खाद्य येत आहे. सध्या दक्षिण मुंबईचा परिसर मराठा आंदोलकांनी भरून गेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
