राजधानी दिल्लीत खलबत ; शिंदेसेना सत्तेतून बाहेर पडणार, मोदी- शहांच्या बैठकीत काय घडलं?

पुणे : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप शिवसेना (शिंदे गट )आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) या तिन्ही पक्षात सातत्याने मतभेद आणि कुरघोडी असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे महायुती सरकारमध्ये सातत्यानं कोंडी होत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. राज्य सरकारमध्ये असलेले शिवसेनेचे अनेक मंत्री सातत्यानं वादात सापडत आहे. शिवसेनेची जाणूनबुजून कोंडी केली जात असल्याची पक्षातील मंत्री आणि आमदारांची भावना आहे. या सगळ्या तक्रारी हो मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. त्याचबरोबर माझ्या नेत्यांचा छळ थांबणार नसेल तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असा अप्रत्यक्ष संदेश भाजप नेतृत्वाला दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सलग दुसऱ्या आठवड्यातला दिल्ली दौरा हा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यांनी आपल्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या महायुतीच्या अडचणीचा पाढा त्यांनी त्यांच्यासमोर वाचला. त्यांच्यामध्ये 25 मिनिटे चर्चा झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत. शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांकडून घेण्यात आलेले अनेक निर्णय बदलले जात असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. शिंदेसेनेच्या काही मंत्र्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे अस्वस्थ आहेत. आपली हीच कैफियत त्यांनी मोदी, शहांपुढे मांडली. राज्यात सरकारमध्ये असताना मिळत असलेल्या वर्तणुकीमुळे शिंदेसेनेत प्रचंड नाराजी आहे.
महायुती सरकारमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे शिंदे यांचे मंत्री नाराज आहेत. त्यामुळे एनडीएमधील भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपकडून आदर, मानसन्मान हवा आहे. याच संदर्भात भाजप नेतृत्त्वाचा शब्द घेण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले होते. आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची कोंडी केली जाऊ नये. सत्तेत समान वाटा मिळावा, अशा मागण्या शिंदे यांनी भाजप नेतृत्त्वाकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.