शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचा सस्पेन्स संपला; ठाकरे की शिंदे? अखेर ठरलं…

मुंबई : दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) होणाऱ्या यंदाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने ठाकरेंच्या सेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या २० ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, यंदा शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरेंच्या सेनेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा अर्ज आलेला नाही. त्यामुळे महापालिकेने प्रशासकीय नियमांनुसार ठाकरेंच्या सेनेला मैदान वापरण्याची परवानगी दिली आहे. ठाकरेंच्या सेनेकडून सुमारे दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे दसरा मेळाव्यासाठी रीतसर अर्ज दाखल करण्यात आला होता.


यापूर्वी दसरा मेळाव्यावरून रंगला होता वाद
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. दोन्ही गटांकडून मैदानावर दावा सांगितला जात असल्याने हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. तसेच इतर काही संघटनांकडूनही मैदानासाठी अर्ज केले जात असल्याने दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापत होते.
ठाकरेंच्या सेनेला थेट परवानगी
मात्र, यंदा कोणताही राजकीय वाद किंवा स्पर्धा न होता ठाकरेंच्या सेनेला शिवाजी पार्क मैदानासाठी थेट परवानगी मिळाली आहे. त्यामुळे २० ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झाले आहे.
आता ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.