खरातच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली ! पुत्रप्राप्तीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार, आता चौथ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी भोंदू अशोक खरात याच्या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता त्याने पुत्रप्राप्तीच्या आमिषाने एका महिलेवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चौथा गुन्ह्यात आता खरातला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महिलांचें लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात त्याच्याकडे विविध समस्यांसाठी येणाऱ्या महिलांना ‘पुत्रप्राप्ती’चे आमिष दाखवत असे. याच बहाण्याने त्याने एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचे विशेष तपास पथकाने न्यायालयात स्पष्ट केले. याची दखल घेत न्यायालयाने खरातला चौथ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष तपास पथकाचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांनी चौथ्या गुन्ह्यात 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने खरातला पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या काळात त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान संशयित खरातविरोधात आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. महिला अत्याचाराचे आठ गुन्हे, फसवणुकीचे सहा आणि धमकावल्याचा एक असा एकूण 15 गुन्ह्यांचा आकडा समोर आला आहे. याशिवाय खंडणी आणि खासगी सावकारीचेही आरोप त्याच्यावर आहेत. या सर्व प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार आहे.

भोंदूगिरीच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा आणि महिलांचें लैंगिक शोषण करणारा खरात हा सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून तो त्यांची वैयक्तिक कागदपत्रे घेत असे. या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याने पतसंस्था आणि विविध बँकांमध्ये बनावट खाती उघडल्याचे समोर आले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आता ईडीकडून केला जात आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आता आणखीन वाढ होणार आहे.