आस्था आणि भक्तीच्या सुगंधाने दरवळला ७९वा निरंकारी संत समागमाचा पहिला दिवस

परमात्म्याच्या अनुभूतीमुळे जीवनात जागृतीची भावना निरंतर कायम राहते -निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज


पिंपरी , २४ ऑक्टोबर २०२६ : जेव्हा हृदयात प्रेम-भक्तीचा प्रकाश जागृत होतो, तेव्हा जीवनातील प्रत्येक भाव प्रेम, समर्पण आणि मानव एकत्वाच्या दिव्य अनुभूतीने सुगंधित होतो. याच आध्यात्मिक चेतनेने आणि प्रेमपूर्ण संदेशाने ओतप्रोत निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी समालखा (हरियाणा) येथील निरंकारी आध्यात्मिक स्थळावर आयोजित चार दिवसीय ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पहिल्या दिवशी देश-विदेशातून सहभागी झालेल्या लाखो श्रद्धाळूंना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रेम, भक्ती आणि मानवी एकत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.

सद्गुरू माताजींनी आपल्या पावन प्रवचनातून सांगितले की, ब्रह्मज्ञान ही जागृतीची अंतिम पायरी नसून, तिची सुरुवात आहे. खरी जागृती तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा मनुष्य जीवनातील प्रत्येक क्षणी निराकार परमात्म्याच्या अनुभूतीसह प्रेम, विश्वास आणि नम्रतेने जीवन जगतो. सत्संगामध्ये केवळ उपस्थित राहणे पुरेसे नाही, तर तेथून प्राप्त झालेल्या शिकवणीचा आपल्या आचरणात अंगीकार करणे आवश्यक आहे. आपली सेवा आणि समर्पण हे केवळ दिखाव्यासाठी नसून त्यामध्ये प्रामाणिक भाव असला पाहिजे. इतरांप्रती प्रेम बाळगणे, निंदा आणि अहंकारापासून दूर राहणे तसेच आपल्या वाणी आणि कर्मातून चांगुलपणा प्रकट करणे, हीच खरी आध्यात्मिक जागृतीची ओळख आहे.

सद्गुरू माताजींनी प्रेरणा देताना सांगितले की, परमात्म्याने आपल्याला प्रदान केलेल्या साधनांचा उपयोग मानवतेची सेवा आणि परोपकारासाठी केला पाहिजे. जीवनातील प्रत्येक परिस्थितीत मनःशांती, सहजता आणि विश्वास कायम ठेवावा. शेवटी माताजींनी आशीर्वाद देताना कामना केली की, सर्व श्रद्धाळूंच्या जीवनात सेवा, सुमिरन आणि सत्संगाप्रती समर्पण सदैव कायम राहावे आणि ब्रह्मज्ञानातून प्राप्त झालेला दिव्य प्रकाश त्यांच्या जीवनाला प्रेम, शांती आणि भक्तीने सदैव उजळून टाकत राहावा.

देश-विदेशातून विविध संस्कृती आणि पार्श्वभूमी असलेल्या श्रद्धाळूंच्या प्रेमपूर्ण मिलनाने संपूर्ण समागम परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून ,प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आणि मनामध्ये परमात्म्याच्या अनुभूतीची आस दिसून आली.

सेवादल रॅली

समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भव्य सेवादल रॅलीने झाली. या रॅलीमध्ये भारतातील विविध राज्यांमधून तसेच विदेशातून सहभागी झालेल्या हजारो सेवादल बंधू-भगिनींनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. शारीरिक व्यायाम, स्किट, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मिशनच्या शिकवणीवर आधारित लघुनाटिकांच्या माध्यमातून शिस्त, सहकार्य आणि निःस्वार्थ सेवेचा सुंदर संदेश देण्यात आला.

सेवादल रॅलीमध्ये उपस्थित बंधू-भगिनी आणि श्रद्धाळूंना आशीर्वाद देताना सद्गुरू माताजींनी संदेश दिला की, सेवा ही केवळ आपले कर्तव्य पार पाडण्यापुरती मर्यादित नसून ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खरा सेवादार तोच, जो निराकार परमात्म्याला हृदयात धारण करून प्रत्येक परिस्थितीत मानवतेच्या कल्याणासाठी तत्पर राहतो.
सद्गुरू माताजींनी प्रेरणा देताना सांगितले की, निराकार परमात्म्यावर अढळ विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा आणि तन, मन व धन परोपकारासाठी समर्पित करून जीवन सार्थक करावे.

यापूर्वी सद्गुरू माताजींच्या शुभहस्ते शांती आणि एकत्वाचे प्रतीक असलेल्या मिशनच्या ‘श्वेत ध्वजा’चे ध्वजारोहण करण्यात आले.

रॅलीदरम्यान संत निरंकारी सेवादलाचे मुख्य संचालक श्री एस. के. जुनेजा यांनी जगभरातून आलेल्या सेवादल स्वयंसेवकांच्या वतीने सद्गुरू माताजींच्या चरणी श्रद्धा अर्पण केली आणि सर्वांसाठी पावन आशीर्वादाची कामना केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!