२० वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल


लोणी काळभोर, ता. २४ : लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयात बीबीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारी २० वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे.१३ ऑक्टोबर रोजी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघालेली सृष्टी मोहन येळे ही अद्याप घरी परतलेली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने तिच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सृष्टी येळे (वय २०, रा. गणराज बिल्डिंग, साईनगरी, चंदननगर, पुणे) असे बेपत्ता विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सृष्टी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजता मैत्रीण गौरी शिवले हिच्यासोबत दुचाकीवरून महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघाली होती. सकाळी साडेआठ वाजता तिने आईला फोन करून महाविद्यालयात पोहोचल्याचे सांगितले. मात्र, दुपारी एकच्या सुमारास आईने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा मोबाईल बंद असल्याचे आढळले.

मुलीशी संपर्क होत नसल्याने वडिलांनी महाविद्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी सृष्टी महाविद्यालयात आली नसल्याचे मैत्रिणी आणि वर्गशिक्षकांनी सांगितले. तिच्या मैत्रिणीने सृष्टीला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पाहिल्याचे सांगितले; मात्र त्यानंतर ती कुठे गेली, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिचितांकडे शोध घेतला. मात्र, सृष्टीचा शोध लागला नाही. अखेर वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.सृष्टीचा रंग गोरा असून उंची सुमारे पाच फूट चार इंच आणि बांधा सडपातळ आहे. बेपत्ता झाली त्या वेळी तिने पांढऱ्या रंगाची पँट, काळ्या रंगाचा टॉप आणि काळे जॅकेट परिधान केले होते. तिच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. हिच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!