अख्खा पक्ष विरोधात, पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘या ‘प्रोजेक्टला काँग्रेसच्या दिग्दज नेत्याचा पाठिंबा… राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला अख्या पक्षाचा विरोध असताना आता काँग्रेसचे विदर्भातील दिग्गज नेते नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे काँग्रेसचे दिग्गज नेते असून त्यांची विदर्भातील राजकारणावर चांगलीच पकड आहे. काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा दिला आहे.याउलट, काँग्रेसमधील इतर नेते शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमीन अधिग्रहित होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, या भीतीवर काँग्रेसचे नेते सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र राऊत यांनी त्याच प्रकल्पाला दुजोरा दिल्याने काँग्रेसच्या भूमिकेत स्पष्ट मतभेद असल्याच दिसून येत आहे.

दरम्यान राऊत यांचे हे पत्र मुख्यमंत्री फडणवीसांसाठी दिलासा देणारे असून शक्तीपीठ महामार्गा’ला चालना मिळू शकते. याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारला देखील आवाहन केले आहे की, ‘शक्तीपीठ महामार्गाला राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून दर्जा द्यावा.’ त्यामुळे हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

