महाराष्ट्रात DJचा दणदणाट बंद होणारच! पण कसा? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन…


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांनी त्यांना विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीबाबत प्रश्न विचारला. या घटनेचा आपण यापूर्वीच निषेध केला असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो. वेगवेगळे विचार असू शकतात. काही लोक या बाजूचे तर काही त्या बाजूचे असू शकतात. मात्र हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. प्रत्येकाने आपला मुद्दा मांडला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सण आणि उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले तर त्याचे महत्त्व अधिक वाढते, असंही फडणवीस यांनी सांगितलं. वर्षानुवर्षे काही प्रथा आणि पद्धती तयार झाल्या आहेत. मात्र त्या बदलताना केवळ कायद्याचा बडगा न उगारता लोकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणे गरजेचे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कायदा वापरावा लागतो, कारण त्याशिवाय काही गोष्टी बंद होत नाहीत. पण त्यासोबत लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणंही गरजेचं आहे. आज माझी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की, अनेक मुद्द्यांवर सर्वांचं एकमत होत आहे, विशेषतः ज्या गोष्टींमुळे नागरिकांना त्रास होतो, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

डीजेच्या मोठ्या आवाजाबाबतही त्यांनी भाष्य केलं. डीजेमध्ये भूकंप आल्यासारखा आवाज असतो. अशा अनेक गोष्टींवर जवळपास सर्वांचं एकमत होत आहे. पुण्यात गणेशोत्सव असो किंवा इतर उत्सव, ते चांगल्या आणि पारंपरिक पद्धतीने साजरे होताना दिसतील. लोकांच्या सहभागातूनच डीजेचं स्तोम कमी होताना आणि हळूहळू संपताना दिसेल, असं फडणवीस म्हणाले.

डीजेबाबत सरकार धोरण तयार करणार?

डीजेसाठी सरकारकडून स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार का, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले की, पॉलिसी एकदम तयार होत नाही. अनुभव असा आहे की चर्चेतून 90 ते 95 टक्के लोक एखाद्या निर्णयासाठी तयार होतात. त्यानंतर आदेश काढता येतो. त्यामुळे थोडा वेळ दिला पाहिजे.

दिशा पक्की ठरली आहे. आपल्याला पारंपरिकतेकडे जायचं आहे आणि प्रचंड ध्वनिप्रदूषणापासून दूर जायचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काही गणेश मंडळांनी डीजे वापरणारच, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत पोलीस आणि मंडळांचे पदाधिकारी आपापसांत चर्चा करून मार्ग काढतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!