गणेशोत्सवात रेल्वेप्रवाशांना नाहक त्रास! पुणे रेल्वेचा 15 दिवसांचा ब्लॉक, 42 ट्रेन्स रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले, जाणून घ्या..

पुणे : सध्या गणेशोत्सव हा काही दिवसांवर आला असून अनेकांनी आपल्या गावाला जाण्याची तयारी केली आहे. मात्र त्यांना आता काहीसा त्रास होण्याची शक्यता आहे. पुण्यात हडपसर ते घोरपडी कोच मेंटनन्स कॉम्प्लेक्स दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी पुणे आणि हडपसर यार्डमध्ये प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामासाठी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तिसऱ्या मार्गिकेच्या कामामुळे भविष्यात पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, रद्दीकरण आणि मार्ग बदलाची माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

त्याचा परिणाम पुणे विभागातून धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस, डेमू आणि लोकल गाड्यांवर होणार आहे. मात्र, ब्लॉकचा काही कालावधी गणेशोत्सवात येणार असल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास होणार आहे. १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान दररोज दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत पुणे-हडपसर मार्गावरील अप आणि डाउन मुख्य मार्गावर ब्लॉक असेल.


त्यानंतर २४ सप्टेंबरपासून ब्लॉकचा कालावधी टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. २२ गाड्यांच्या ७१ फेऱ्यांचे नियमन, तर १४ गाड्यांच्या २५ फेऱ्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई, पुणे-हावडा या एक्स्प्रेस गाड्यांस विविध मार्गांवरील गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे.
तीन ऑक्टोबरला हडपसर यार्डमध्ये सकाळी आठ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते चार या वेळेत वाहतूक ब्लॉक असेल. चार ऑक्टोबरला मुख्य कामाचा दिवस असून, हडपसर–जीसीएमसी विभागात मध्यरात्रीपासून सकाळी साडेदहापर्यंत वाहतूक ब्लॉक सुरू राहणार आहे. तसेच सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सिग्नल व दूरसंचार यंत्रणेशी संबंधित कामांसाठी ब्लॉक घेण्यात येईल.
यामुळे एकूण ४२ मेल-एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यातून एकूण ९८ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. तसेच २५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत, त्यांचा ३६ फेऱ्यांवर परिणाम होईल. ३५ गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकाऐवजी अन्य स्थानकांवर अल्प समाप्त किंवा अल्प प्रारंभ करण्यात येणार आहेत.