शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीची तारीख जवळपास निश्चित; ५ लाख शेतकऱ्यांना ४ हजार कोटींचा दिलासा, खात्यात पैसे कधी जमा होणार?

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत लाभार्थ्यांच्या दोन याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता तिसऱ्या यादीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या टप्प्यातील पात्र कर्जखात्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात जवळपास ५ लाख शेतकऱ्यांना सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या योजनेला २ जून २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर कर्जमाफीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. आता तिसऱ्या यादीसाठी पात्र कर्जखात्यांची पडताळणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

३२ लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर


योजनेच्या अंमलबजावणीसाठी ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खासगी बँका, अशा एकूण ५३ बँकांनी ३२ लाख कर्जखात्यांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तपासून त्यानुसार लाभार्थी याद्या तयार केल्या जात आहेत.
कर्जमाफीसाठी कोणते कर्ज पात्र?
योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेले, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीक कर्ज तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांना नियोजित निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.
पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पडताळणी झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर मंजूर कर्जमाफीची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जाणार आहे. माहितीमध्ये तफावत किंवा अन्य अडचणी असल्यास त्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण यंत्रणाही कार्यरत आहे.
दरम्यान, तिसऱ्या यादीत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश होणार, याची अधिकृत माहिती यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील अधिकृत घोषणेकडे लागले आहे.