तीन दिवस कार जागची हलली नाही, अचानक दुर्गंधीने नागरिकांना संशय! दरवाजा उघडताच आत दिसलं भयंकर दृश्य; सारसबागेसमोर तरुणाचा मृतदेह, हत्येचा संशय

पुणे : पुण्यातील गजबजलेल्या सारसबाग परिसरात एका बेवारस कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एक मारुती अल्टो कार एकाच ठिकाणी उभी होती. सुरुवातीला या कारकडे कोणाचे लक्ष गेले नाही. मात्र, कारमधून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडताच आत फुगलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह दिसून आला.

ही घटना खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह आढळलेली कार मारुती अल्टो असून तिचा क्रमांक एमएच १२ एसएफ ५४७१ आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तो लोणी काळभोर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच हा तरुण काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, त्याची अधिकृत ओळख अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. नातेवाईकांकडून मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर नाव स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुर्गंधीमुळे नागरिक सतर्क; पोलिसांची घटनास्थळी धाव

स्थानिकांच्या माहितीनुसार, नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर ही कार दोन ते तीन दिवसांपासून उभी होती. बुधवारी कारमधून दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी संशय व्यक्त केला. दादाची वाडी येथील जैन मंदिर परिसरातील एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कारची तपासणी केली असता आत तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेह एक ते दोन दिवसांपूर्वीचा असण्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक अंदाजात व्यक्त केली आहे.

शरीरावर मारहाणीच्या खुणा; घातपाताचा तपास सुरू
मृत तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात झाला आहे का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, ही कार तीन दिवसांपासून त्याच ठिकाणी का उभी होती? ती तिथे कोणी आणली? तरुणाचा मृत्यू कारमध्येच झाला की मृतदेह नंतर वाहनात ठेवण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यास सुरुवात केली आहे. मृताची ओळख पटवणे आणि मृत्यूमागील नेमके कारण शोधणे, ही पोलिसांसमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत.
