बारामतीत ‘बुलेट’ चोराचा धुमाकूळ अखेर थांबला! ३० लाखांच्या १९ दुचाकी जप्त; १९ चोरीचे गुन्हे उघड


बारामती : बारामती शहर आणि तालुका परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या चोरीच्या घटनांमागील एका युवकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपये किमतीच्या १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये तब्बल १३ बुलेट आणि ६ इतर मोटारसायकलींचा समावेश आहे. या कारवाईमुळे बारामती शहर व बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे आहे. पोलिस पथके बारामती शहर परिसरात गस्त घालत असताना चोरीची मोटारसायकल घेऊन एक संशयित मेडिकल कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे व्हीआयपी क्रमांकाची प्लेट असलेली बुलेटसह इतर दुचाकी आढळून आल्या.

तपासात आरोपीने चोरी केलेल्या वाहनांचा वापर करताना त्यावर महाराष्ट्र पोलिस, महाराष्ट्र वनसेवा आणि एसटी महामंडळाचे लोगो लावल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १३ बुलेट आणि ६ इतर मोटारसायकली ताब्यात घेतल्या असून, या वाहनांची अंदाजे किंमत ३० लाख रुपये आहे. चोरीच्या दुचाकींचा एवढा मोठा साठा आढळून आल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पो.स.ई. बाळासाहेब कारंडे यांच्यासह पोलिस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, अभिजीत एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे आणि विठ्ठल तरंगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांडमध्ये असून, जप्त केलेल्या दुचाकी आणखी कोणत्या चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत का, याचा पुढील तपास बारामती तालुका पोलिसांकडून सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!