शिवसेनेतील फुटीचा आणखी एक मोठा फटका ठाकरेंना बसणार; विधिमंडळातील चित्र बदलणार?

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे, असा अंदाज सध्या व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून शिवसेना पक्ष फोडला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.
शिवसेनेत सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट आपल्याला पाहायला मिळत आहे. सत्ता जाऊनही उद्धव ठाकरे यांच्या अजूनही अडचणी संपत नाहीत. सत्ताधाऱ्यांनी आता ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेते पदावरून निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे अंबादास दानवे यांना विरोधी पक्षावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेत अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते पदावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते पदावरून अंबादास दानवे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान विधान परिषदेत काँग्रेसकडे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.