खेड अपघातप्रकरणी टेम्पोचालकाला अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; म्हाळुंगे पोलिसांकडून कारवाई..


खेड : पिकअप गाडीच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.११) दुपारी साडेबाराच्या सुमारास पापळवाडी ते कुंडेश्वर महादेव मंदिर डोंगराच्या पायथ्यालगत घडली. याप्रकरणी आता पिकअप टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.

तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याच्यावर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अपघातात 30 हून अधिक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाले असून, आरोपी चालकाने त्यांच्या जीवाशी खेळ केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

खेड तालुक्यातील पापळवाडी गावातील ३५ महिला आणि दोन लहान मुले अशी एकूण 37 जणांची टोळी दर्शनासाठी कुंडेश्वर शिव मंदिराकडे निघाली होती. त्यांनी प्रवासासाठी एक पीकअप वाहन वापरले होते.

मात्र, घाटातील पहिल्याच वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, आणि गाडी पाच ते सहा पलट्या खात खोल दरीत कोसळली. या भीषण घटनेत दहा महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जण गंभीर जखमी झाले.

या अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच वाहनातील भाविक गाणी म्हणत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आनंदमय क्षणांनंतर काही वेळातच झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, चालक ऋषिकेश करंडे याला म्हाळुंगे पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली असून, त्याच्यावर आयपीसी कलम 304 (A) अंतर्गत सदोष मनुष्यवध, तसेच वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण, वाहनाची स्थिती आणि चालकाची जबाबदारी यावर सखोल चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!