राज्यातील शिक्षकही आता गणवेशात दिसणार!! लागू होणार नवीन ड्रेस कोड, शालेय मंत्री दादा भुसे यांचा निर्णय..

मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे . आता महाराष्ट्रातील शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशात दिसणार आहेत. राज्याचे शालेय मंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. विशेष म्हणजे यासाठी शासन निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ही माहिती भुसे यांनी यावेळी दिली.
यामुळे महाराष्ट्रातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात बोलतांना शिक्षकांच्या ड्रेस कोड बाबत सुतोवाच केले. त्यांनी राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना लवकरच ड्रेसकोड लागू करण्यात येणार असून, यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येणार अशी माहिती यावेळी दिली आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच याबाबत पुढील निर्णय होईल. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी अजंग येथील शाळेचे शाळेतील कर्मचाऱ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. अजंग येथील शाळेतील सर्व कर्मचारी एकाच गणवेशात होते आणि यामुळे दादा भुसे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
शिक्षकांनी सुद्धा शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी भुमिकेत असावे, यासाठी ड्रेसकोड उपयुक्त ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणवेशात दिसल्यास शाळेचा अनुशासन व एकात्मतेचा संदेश जाईल. विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित यावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलीसारखे उपक्रम राबवावेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना भुसे यांनी जर शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाला तर राज्याच्या शिक्षणव्यवस्थेत सकारात्मक बदल होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी शाळेत झालेल्या या कार्यक्रमात ओएनजीसी व अवंत फाऊंडेशनच्या CSR उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्क आणि शालेय बॅग्स वाटप करण्यात आल्या.