मुलीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव, गुपचूप अंत्यसंस्कारही केले; नदीत अस्थी विसर्जित केल्या, पण एका गुप्त माहितीने वडिलांचं भयानक सत्य उघड!

वाशिम : मुलीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं, मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्याच दिवशी अस्थीविसर्जनही उरकलं. सर्व काही सुरळीत पार पडल्याचं वाटत असतानाच पोलिसांना मिळालेल्या एका गुप्त माहितीने या प्रकरणाला धक्कादायक वळण दिलं. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे ३५ वर्षीय विवाहित महिलेची तिच्याच वडिलांनी गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या कथित प्रेमसंबंधांमुळे आणि समाजातील बदनामीच्या रागातून हा गुन्हा घडल्याचा आरोप आहे.

२०१६ मध्ये विवाह, दोन मुलांची आई; तरीही माहेरी राहत होती
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा २०१६ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील एका तरुणाशी विवाह झाला होता. तिला दोन मुले आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून ती माहेरी राहत होती. गेल्या एक ते दीड वर्षापासून तिचे पतीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या वडिलांना मिळाली होती. त्यांनी वारंवार समजावून सांगितले, तरीही ती ऐकत नसल्याचा आरोप आहे. दसऱ्याच्या काही दिवस आधीही ती प्रियकराला भेटण्यासाठी गेल्याचे समोर आले आहे.


२० ऑक्टोबरच्या रात्री नेमकं काय घडलं?
मुलीच्या कथित प्रेमसंबंधांमुळे समाजात बदनामी होत असल्याच्या रागातून आरोपी वडिलांनी २० ऑक्टोबरच्या रात्री शेल्याने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. त्यानंतर शेतात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.
अस्थीविसर्जनही उरकलं; पण पोलिसांना मिळाली गुप्त माहिती
अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीने मुलगा आणि मामाच्या मदतीने जऊळका परिसरातील काटेपूर्णा नदीत अस्थीविसर्जन केल्याची माहिती समोर आली. मात्र, या घटनेबाबत शिरपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने तपास सुरू झाला. पोलिसांनी महिलेच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी हत्येची कबुली दिल्याची माहिती आहे.
नदीतून अस्थी हस्तगत; न्यायवैद्यक तपास सुरू
मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काटेपूर्णा नदीतून विसर्जित केलेल्या अस्थी शोधून काढल्या असून, न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे. वरकरणी हृदयविकारामुळे झालेला मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणामागील सत्य गुप्त माहिती आणि पोलिसांच्या तपासामुळे उघडकीस आले आहे.
