उरुळीकांचन स्वच्छताग्रुपची बातचं न्हारी ! स्वच्छता अभियान , रक्तदान शिबीर, वृक्षारोपन , पालखी सोहळा स्वच्छता सर्व कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद ..!!

उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपच्या संघटीतपणाने निस्वार्थीपणाने केलेले कामाचे फलीत म्हणून या ग्रुपच्या प्रत्येक कार्यास मिळणारा सहभाग असल्याचे मत ज्येष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन यांनी व्यक्त केले आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ‘ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन’ संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपतर्फे जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दर्पण व ससून ब्लड बँकेची रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन येथील बी.जी. शिर्के बाल विकास मंदिर या ठिकाणी रविवारी (दि. 16) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी के. डी. कांचन बोलत होते.
या रक्तदान शिबिरात 707 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण पूरक झाडाचे रोप, प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हवेलीचे ज्येष्ठ नेते के. डी. बापू कांचन, यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, सोपान कांचन, उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, अजिंक्य कांचन, राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच रामभाऊ तुपे, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, राजेंद्र टिळेकर, संतोष शितोळे, बापु सुरवसे, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, सोमनाथ बगाडे आदि मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दरम्यान, मागील 9 वर्षापासून हा ग्रुप उरुळी कांचनसह परिसरात संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सहभागाने ग्राम स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, हजारो झाडे लावून संवर्धन करण्याचे काम पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचे कार्य जोमाने करीत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसर व पालखी मार्ग स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.