राज्यात उष्णतेचा कहर! महाराष्ट्र अक्षरशः तापला, आता 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट, काळजी घ्या…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या असून अनेक ठिकाणी घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. विदर्भात तीव्र उष्णतेची लाट असून पारा ४४ अंशांपलीकडे गेला आहे. अकोला, अमरावतीत उष्णतेचा कहर आहे. अकोल्यात बुधवारी ४४.२ अंश सेल्सिअस तर अमरावती शहरात ४४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.

यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. अकोला सलग चौथ्या दिवशी भारतातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. तर जगातही ते सर्वाधिक उष्ण ठरले. वर्धा, नागपूर या शहरात देखील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. आणखी काही दिवस वैदर्भीयांना हा ताप सहन करावा लागणार आहे. यामुळे शक्यतो उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठवाड्यात उष्णतेची लाट आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील उष्णतेचा पारा चढला आहे.राज्यात एप्रिलच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली होती, मात्र दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाचा चटका वाढत चालला आहे. राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम आहे.

१६ एप्रिलला राज्यातील १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान स्थिती कायम आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात आज पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील उष्णतेचा पारा चढला आहे. अकोल्यापाठोपाठ अमरावती येथे ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

पुण्यासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत उष्णतेची लाट आहे. बुधवारी १५ एप्रिलला अकोल्यात ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक होते. वर्धा ४३.९, नागपूर ४३.४, सोलापूर ४३.३, मालेगाव ४३.२ व बीड येथे ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.