सीईटी सेल परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना लाखांचा गंडा, पेपर देऊन आल्यानंतर मोबाईल बघितला अन् विद्यार्थ्यांना धक्काच बसला, नेमकं काय घडलं?

संभाजीनगर : श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज सातारा आणि देवगिरी महाविद्यालय संभाजीनगर परिसरातील २ आणि ३ मे रोजी सीईटी सेलची परीक्षा होती. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सीईटी सेल विद्यार्थ्यांवर लक्ष्य केंद्रित करत चोरट्यांनी मोठा आर्थिक फटका दिला आहे.
या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकी आणि चारचाकींच्या डिक्या फोडल्या. परीक्षेला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या फोनचे सिमकार्ड, एटीएम व क्रेडिट कार्ड चोरले गेले. ही चोरी चोरट्यांनी अवघ्या तासाभरात केली असून विद्यार्थ्यांना ९ लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत 18 विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे.
चोरट्यांनी मोबाईल फोडून त्यामधील सिमकार्ड, एटीएम व क्रेडिट कार्ड काढले. मोबाईल तसाच फेकून दिला. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परतल्यावर त्यांना त्यांच्या फोनमधील सिम गायब असल्याचे लक्षात आले. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. नंतर अनेकांच्या लक्षात ही बाब आली.
काही विद्यार्थ्यांनी सिम बंद करून खात्यातील हालचाल तपासली असता, पैसे गायब झाल्याचे लक्षात आले. यामुळे मोठा धक्का त्यांना बसला. चोरट्याने नवीन पिन निर्माण केला. नवीन पिनच्या साहाय्याने एटीएममधून रोख रक्कम काढली क्रेडिट कार्डद्वारे मॉलमध्ये व ऑनलाइन खरेदी करत एका तासात ५५ हजारांचे कपडे खरेदी केली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.