ऑक्टोबर हीटचा विद्यार्थ्यांना फटका! दुपारच्या शाळांमुळे त्रास; ‘या’ जिल्ह्यात वेळ बदलणार?


मुंबई : मान्सूनच्या परतीच्या प्रवासासोबतच महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे. अनेक भागांमध्ये तापमानात वाढ झाली असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्याने कडक उन्हामुळे उकाडा वाढला आहे.

या वाढत्या तापमानाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा दुपारऐवजी सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र पाठवलं आहे.

विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देण्याची मागणी

वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या हवामान परिस्थितीकडे लक्ष वेधलं आहे. जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला असून सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. त्यातच कडक उन्हामुळे उकाडा आणि तापमानात वाढ होत आहे.

दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्याने लहान मुलांना उन्हाच्या तीव्र झळांमध्ये शाळेत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा देण्यासाठी सिंधुदुर्गातील सर्व शाळा तातडीने सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबईसह कोकणात उष्णतेचा तडाखा

दरम्यान, मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील काही भागांतही उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांना वाढत्या उकाड्याचा सामना करावा लागला.

3 ते 5 ऑक्टोबरदरम्यान मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये दमट आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज होता. आता 7 ऑक्टोबरपासून मुंबई आणि ठाणे परिसरात हवामान मुख्यतः कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!