हट्ट बेतला जीवावर! खडकवासला धरणात बुडालेल्या दोघींचे मृतदेह अखेर सापडले
पुणे : पुण्यातील खडकवासला धरण परिसरात 9 मुली पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजूनही शोध मोहीम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) येथे खडकवासला धरणात बुडालेल्या दोघींचे मृतदेह शोधण्यात पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
खुशी संजय खुर्दे (वय 13, पाण्याच्या टाकीजवळ, सोळंकी लेआऊट, ता. बुलढाणा) शितल भगवान टिटोरे (वय 18, आंबोडा झरीझरी, ता. जि. बुलढाणा) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.
तर, कुमुद संजय खुरदे (वय 10), पायल संतोष सावळे (वय 16, रा. राजीवनगर, सुरत, गुजरात), शितल अशोक धामणे (वय 17, रा. बोधवड जि. जळगाव.), राशी सुरेश मांडवे वय 9, रा.देऊळघाट , बुलढाणा), पल्लवी संजय लहाणे (वय 10, रा. बोरगाव ता. चिखली, बुलढाणा ) मिना संजय लहाणे (वय 32, रा. बोरगाव ता. चिखली, बुलढाणा) , राखी संजय लहाणे (वय 16, रा. बोरगाव ता चिखली, बुलढाणा) यांना वाचविण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गोऱ्हे खुर्द येथे उदरनिर्वाहासाठी आलेल्या संजय लहाणे यांच्या घरी मांडव परातणीचा कार्यक्रम होता. त्यासाठी बुलढाणा व जळगाव येथून त्यांचे नातेवाईक आले होते. लहाणे खडकवासला धरणाच्या पाण्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये राहतात.
तसेच सकाळी उठल्यानंतर मुलींनी पोहण्याचा हट्ट केला. सोबत आलेल्या वृद्ध महिलांनी मुलींना पाण्यात जाऊ नका असे सांगितले परंतु मुलींनी ऐकले नाही. पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने मिना संजय लहाणे यांच्यासह इतर सहा मुली पाण्यात बुडू लागल्या.
काठावर बसलेल्या दोघींनी आरडाओरड केल्यानंतर सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आलेले स्थानिक संजय माताळे, राजेंद्र जोरी, कालिदास माताळे,शिवाजी माताळे व रमेश भामे हे मदतीसाठी धावले. संजय माताळे यांनी पाण्यात उडी घेऊन एक-एक करुन पाच जणींना पाण्याबाहेर काढले.
राजेंद्र जोरी, कालिदास माताळे व इतरांनी बाहेर काढलेल्या मुलींच्या पोटातील पाणी बाहेर काढून तातडीने खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले. हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, हवालदार दिनेश कोळेकर व विलास प्रधान हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान , पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज माळी, किशोर काळभोर, सुरज माने, योगेश मायनाळे व ओंकार इंगवले या जवानांनी बुडालेल्या दोघींचे मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले. पुढील कार्यवाही हवेली पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.