कोथरूडमध्ये तुफान धुमाकूळ!! मुरलीधर मोहोळ यांच्या माणसाला गजा मारणे टोळीकडून मारहाण, नेमकं काय घडलं….

पुणे : शहरातील कोथरूड येथे शिवजयंतीच्या दिवशी गजानन मारणे टोळीतील गुंडांनी केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

या हल्ल्यामध्ये बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांचा समावेश होता. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणे याचा भाचा आहे. याबाबत माहिती अशी की, बाईकला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि गुंडांनी जोग यांना गंभीर जखमी केले.
याबाबत पोलीस तपास करत आहेत. चार जण दुचाकीवर जात असलेल्या देवेंद्र जोग यांना कट मारला. रागाने पाहिल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला, आणि चारही जणांनी मिळून जोग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करून आरोपी फरार झाले.

घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग यांची प्रकृतीची विचारपूस केली. जोग हे मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयात सोशल मीडिया कॅम्पेनिंगचे काम करतात. कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. यामधील मुख्य आरोपी गुंड गजानन मारणेचा भाचा बाबू पवार फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गजानन मारणे टोळीच्या गुंडांनी दिवसाढवळ्या मारहाण केल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.