४ वर्षांखालील चिमुकल्यांना सर्दी-खोकल्याचं औषध देण्याआधी थांबा! केंद्राचा मोठा निर्णय; ‘या’ दोन घटकांच्या औषधांवर कडक निर्बंध

पुणे : लहान मुलांच्या आरोग्याबाबत केंद्र सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांपासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक एकत्र असलेल्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
लहान मुलांमध्ये या औषधांच्या वापरामुळे संभाव्य आरोग्यधोके निर्माण होऊ शकतात, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानंतर तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींचा विचार करून केंद्राने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मते, ४ वर्षांखालील मुलांसाठी तुलनेने सुरक्षित उपचार पर्याय उपलब्ध आहेत.

औषधाच्या पाकिटावर स्पष्ट इशारा देणे बंधनकारक


नवीन आदेशानुसार, संबंधित औषधांच्या लेबलवर, पॅकेज इन्सर्टवर आणि प्रचारात्मक साहित्यावर हे औषध ४ वर्षांखालील मुलांसाठी वापरू नये, असा स्पष्ट इशारा देणे आवश्यक आहे. औषध कंपन्यांना पॅकेजिंग आणि लेबलिंगमध्ये त्यानुसार बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आधीही सरकारने दिला होता इशारा
केंद्र सरकारने यापूर्वी १५ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचना काढून क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या काही विशिष्ट FDC औषधांवर वयासंदर्भातील इशारा लागू केला होता. आता या नियमांची व्याप्ती वाढवण्यात आली असून, या दोन्ही घटकांचे संयोजन असलेल्या सर्व संबंधित फॉर्म्युलेशन्सचा समावेश करण्यात आला आहे.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
मुलाला सर्दी, खोकला किंवा नाक बंद झाल्याची लक्षणे दिसल्यास पालकांनी स्वतःहून औषध देण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः ४ वर्षांखालील मुलांना कोणतेही सर्दी-खोकल्याचे औषध देण्यापूर्वी त्यातील घटक आणि वयोमर्यादा तपासणे आवश्यक आहे. केंद्राच्या या निर्णयाचा मुख्य उद्देश लहान मुलांना औषधांच्या संभाव्य दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवणे हा आहे.