शनिवारी माळेगावचा कारभारी ठरणार!! अध्यक्षपदी अजित पवार यांचे नाव फायनल पण उपाध्यक्ष कोण?

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहाती सत्ता काबीज केला. विरोधकांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. अजित पवार यांनी 20 जागा जिंकल्या. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारावेळी सांगितले होते की, मीच माळेगावचा चेअरमन होणार आहे. यामुळे चेअरमनपदी अजित पवार यांची निवड निश्चित मानली जात आहे. असे असताना व्हा. चेअरमन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये देखील अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे अजित पवार नेमकं कोणाला संधी देणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत चार पॅनल तयार झाल्याने उत्सुकता वाढली होती प्रमुख विरोधक असलेले रंजन काका तावरे चंदरराव तावरे यांनी जोरदार टक्कर देत मोठ्या प्रमाणावर मतदान घेतले. असे असताना मात्र त्यांचा पॅनल काही थोड्या मतांनी पराभूत झाला. यामध्ये केवळ चंद्रराव तावरे यांना विजय मिळवता आला.
शरद पवार गटाने देखील पॅनल उभा केला होता. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चेअरमन पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने ब वर्ग मधून उमेदवारी अर्ज दाखल करून आपणच चेअरमन होणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, आता निवड प्रक्रिया उद्या माळेगाव कारखान्यावरच होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली असून अजित पवार कोणाच्या गळ्यात माळ टाकणार हे उद्याच समजणार आहे. याकडे सध्या सभासदांचे लक्ष लागले आहे.