राज्य सरकारचा मोठा निर्णय ! शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा ; वयाच्या अटीमध्ये दोन वर्षाची शिथीलता…!


मुंबई : शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत केले आहे . या निर्णयामुळे सरळसेवेने शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या गट-अ, ब, क व ड (वर्ग १-४) या पदांसाठीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शासनाने भरती प्रक्रिया राबवित असतांना लोकप्रतिनिधींकडूनही अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत. या निवेदनांचा विचार करून आणि कोरोना विषाणू संकट अशा कारणांमुळे ज्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परिक्षेत बसण्याची संधी प्राप्त करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांनी शिथिलता म्हणजेच जर खुल्या प्रवर्गासाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असेल तर ती 40 वर्षे ग्राह्य धरली जाईल व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे असेल तर ती ४५ वर्षे ग्राह्य धरली जाईल. यामुळे ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!