Sortapwadi : सोरतापवाडीत सत्ताधारी गटाला दे धक्का! २ मतं फुटल्याने विरोधी गटाच्या पारड्यात सरपंचपद..

Sortapwadi उरुळीकांचन : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाची दोन मते फुटल्याने तीन वर्षाच्या सत्तानंतर सरपंचपद हे विरोधी गटाला जाऊन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल विठ्ठल चौधरी यांची धक्कादायक निवड झाली आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाच्या सरपंच संध्या अमित चौधरी यांनी तीन वर्षानंतर सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज (ता.२४) मंडळ अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून पूनम नवनाथ आढाव तर विरोधी गटाकडून स्नेहल विठ्ठल चौधरी यांचा अनुक्रमे अर्ज दाखल झाले होते.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माथाडी कामगार नेते बाळासाहेब चौधरी, जेष्ठ नेते रामदास चौधरी, राजेंद्र चौधरी, सोनबा चौधरी, बाळासाहेब चोरगे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला १५ पैकी ८ जागा मिळाल्या होत्या तर, सोरतापवाडीच्या माजी सरपंच सागर चौधरी व सुदर्शन चौधरी यांच्या गटाला ७ जागा मिळाल्या होत्या. Sortapwadi


आज सत्ताधारी पॅनेलच्या वतीने पूनम नवनाथ आढाव यांनी अर्ज दाखल केला होता. अपेक्षेप्रमाणे त्यांची सरपंचपदी वर्णी लागेल अशी अपेक्षा असताना, विरोधी गटाकडून स्नेहल चौधरी यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला.
यात १५ सदस्यांच्या झालेल्या मतदानात स्नेहल विठल चौधरी यांना ९ मते तर, पूनम नवनाथ आढाव यांना ६ मते मिळाली. या मतानंतर सत्ताधारी गटाचे दोन मते फुटल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गेल्या ७० वर्षांनंतर सोरतापवाडी ग्रामपंचायमध्ये सत्ताधारी गटाला मिळालेली सत्ता गमवावी लागली आहे.
बैठकीला मात्र आठ सदस्य हजर..
सरपंचपदाच्या निवडणूकीत सत्ताधारी गटाचे दोन सदस्य फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर झालेल्या गटाच्या बैठकीत मात्र ८ सदस्यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे २ फुटीर सदस्य कोन म्हणून त्या नावांची शोधाशोध सुरू होती .