सोमेश्वर कारखान्याने ऊसदराची कोंडी फोडली ; यंदाच्या हंगामाची एफआरपी 3285 रुपये प्रतिटन, एप्रिलपर्यंत तुटणाऱ्या ऊसाला 3585 रुपये!


पुणे : राज्यातील अग्रेसर असलेल्या पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडली असून 2025- 26 ची कारखान्याची एफआरपी 3285 रुपये प्रतिटन जाहीर केली आहे. कारखान्याने कायमच या एफआरपी पेक्षा जास्त दर दिला आहे आणि यावर्षी देखील उच्चांकी ऊसदराची परंपरा सोमेश्वर राखणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे.

या संदर्भात कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिद्धीस पत्र दिले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे नमूद केले आहे. कारखान्याचा गाळप हंगाम 2025-26 मधील एफआरपी 3285 रुपये प्रतिटन येत असून, फेब्रुवारी 2026 मध्ये जो ऊस गाळपासाठी येईल त्या उसाला 3385 रुपये, मार्च 2026 मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला 3485 व एप्रिलमध्ये गाळपास येणाऱ्या उसाला 3585 रुपये प्रतिटन ऊस दर दिला जाणार आहे.

याबाबत जगताप यांनी नमूद केल्यानुसार शेतकऱ्यांनी ऊस लागण करीत असताना पाच फूट सरीमध्येच उसाची लागण करावी. जेणेकरून ऊस तोडणी मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी उसाची तोडणी यंत्राद्वारे करणे सोयीचे होणार आहे. गाळप हंगाम 2026-27 करिता ऊस तोडणी यंत्राने केलेल्या ऊसाला अतिरिक्त 50 रुपये प्रतिटन अनुदान देण्यात येणार आहे.तसेच कार्यक्षेत्रामध्ये मुबलक ऊस तोडणी यंत्रणा असून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी झाल्यास कारखानाच्या शेतकी खात्याशी संपर्क साधावा आणि सभासदांनी आपला ऊस जळीत करून तोडणी करण्यासाठी संमती देऊ नये. ज्या सभासदांना ऊस बिलातून सोसायटीची रक्कम कपात करावयाची नाही अशा सभासदांनी कारखान्याकडे रीतसर अर्ज करावेत असे देखील जगताप यांनी नमूद केले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!