सोमेश्वरने उसदराची विक्रमी कोंडी फोडली! एफआरपी पेक्षा ५०० रुपयांचा अधिकचा भाव! जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या दराच्या अपेक्षा वाढणार …!

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यातील ऊसदराची कोंडी फोडली असून सन २०२२-२३ या हंगामात गाळपास आलेल्या उसाला तब्बल ३ हजार ३५० रुपये दर जाहीर केला आहे. ऊस दराची कोंडी फोडत कारखान्याने उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे.
सोमेश्वरने मंगळवारी(दि.८) रोजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामध्ये गत हंगामातील ऊसाला टनाला ३ हजार ३५० रुपये दर देण्याचा अधिकृत निर्णय संचालक मंडळाने घेतला.
यावेळी उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, सुनिल भगत, शैलेश रासकर, आनंदकुमार होळकर, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
सोमेश्वरने गेल्या हंगामात तुटून गेलेल्या उसाला २ हजार ८४६ रुपये एफआरपी दिली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला ५४ रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना २ हजार ९०० रुपये अदा केले होते. त्यामुळे सोमेश्वरच्या सभासदांना टनाला ५०० रुपये वाढवून मिळणार आहेत.
सोमेश्वर ने गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने एकुण १२,५६,७६८ मे. टनाचे गाळप केले असुन सरासरी ११ टक्के साखर उतारा राखत १४,६७,९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन ८,९२,५१,७७९ युनिट्सची वीजनिर्मिती केली असुन ५,००,७१,७९७ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे.
कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातुन ९१,०७,२८७ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन सोबत ४१,९५,९८४ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे.
सन २०२२-२३ हंगामाची एफआरपी २८५० रुपये होती त्यावर कारखान्याने आजअखेर सभासद व विगर सभासद यांना २९०० रुपये प्रति मे.टन प्रमाणे रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे. उर्वरीत रक्कम दिवाळीपुर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.
काटकसर व उत्तम नियोजनपुर्व कारभार, अजित पवार यांचे मार्गदर्शन, साखर निर्यातीचे व विक्रीचे धोरण, डिस्टीलरीमधून मिळालेले ५० कोटी रुपये उत्पादन यामुळे सोमेश्वर सर्वोच्च दर देवू शकला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांचे आभार मानले आहेत