लग्नाचं आश्वासन, प्रियकराची खोली अन् यमुनेत सापडलेलं पोतं; विशाखा प्रकरणात धक्कादायक खुलासा


आग्रा : २६ वर्षीय विद्यार्थिनी विशाखा ओझा अचानक बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या तपासाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. सुपर टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विशाखाचा २९ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांशी संपर्क तुटला. बराच वेळ शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल क्रमांकाच्या संपर्काची माहिती तपासली असता तहसील कार्यालयात लेखपाल म्हणून कार्यरत असलेल्या शिवजीत भदौरिया याचं नाव समोर आलं.

पोलिसांनी शिवजीतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता विशाखासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये लग्नाची चर्चा होती. मात्र, याचदरम्यान शिवजीतने मे महिन्यात दुसऱ्या तरुणीशी विवाह केल्याचं पोलिस तपासात समोर आलं. यामुळे विशाखा आणि शिवजीत यांच्यात वारंवार वाद होत असल्याचा दावा आरोपीने चौकशीत केला.

३० सप्टेंबरला नेमकं काय घडलं?

आरोपीच्या कथित जबाबानुसार, ३० सप्टेंबर रोजी विशाखा शिवजीतच्या खोलीवर गेली होती. लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर विशाखाने खोलीतील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा शिवजीतने केला आहे. मात्र, या दाव्याची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे.

विशाखाचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या शिवजीतने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याने मृतदेह पोत्यात भरून तो स्वतःच्या कारमध्ये ठेवला आणि यमुना नदीत फेकून दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळे प्रकरणाला आता गंभीर स्वरूप प्राप्त झालं आहे.

यमुनेच्या किनाऱ्यावर सापडलं संशयास्पद पोतं

दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एका गावाजवळ यमुना नदीच्या किनाऱ्यावर स्थानिकांना संशयास्पद पोतं आढळलं. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोतं उघडल्यानंतर त्यात तरुणीचा मृतदेह असल्याचं समोर आलं. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख विशाखा ओझा अशी पटली.

मात्र, या प्रकरणात आरोपीच्या कथनावरच सध्या पूर्णपणे विसंबून राहता येणार नाही. विशाखाच्या वडिलांनी शिवजीतचा आत्महत्येचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विशाखाची हत्या करण्यात आली असून या घटनेमागे दोन्ही कुटुंबांमधील २०१७ पासूनचं जुनं वैमनस्य असू शकतं.

आत्महत्या की हत्या? तपासातून होणार उलगडा

विशाखाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिचा मृत्यू आत्महत्या होती की तिची हत्या करण्यात आली, याचा तपास आता पोलिस करत आहेत. मृतदेह खोलीतून कारपर्यंत कसा नेण्यात आला, तो यमुना नदीपर्यंत नेण्यासाठी आरोपीला कोणाची मदत झाली का आणि या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

आग्रा पोलिसांनी शिवजीत भदौरिया याला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर विशाखाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!