पुण्यात धक्कादायक घटना! रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु, नवऱ्याच्या धमकीनंतर बायकोची आत्महत्या..

पुणे : पुण्यात एक धक्क्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारुन टाकू, अशी धमकी नवऱ्याने विवाहितेला दिली होती. यानंतर या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहा विशाल झेंडगे (वय 27) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
स्नेहाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ती पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहत होती. या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील हुंडाबळींची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या कटू आठवणी अजून ताज्या असताना ही घटना घडली आहे.
याबाबत मुलीचे वडील म्हणाले, आम्ही झेंडगे कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही महिने झेंडगे कुटुंबीय मोहोळला राहत होते, नंतर ते पुण्यात राहायला आले. आम्ही स्नेहाचा नवरा विशाल याच्या मागणीप्रमाणे त्यांना पाच लाख रुपये दिले. झेंडगे कुटुंबीय पुण्यात कुठे राहायला आहेत, हे त्यांनी आम्हाला सांगितले नाही.
झेंडगे यांची वेळू येथे कंपनी आहे. स्नेहाचे भाऊ कंपनीत गेले होते, त्यावेळी त्यांना हाकलून देण्यात आले. लग्नानंतर सासरकडून त्रास सुरू झाला. सुरुवातीला स्नेहाला स्वयंपाक नीट येत नाही, असे सांगून त्रास दिला जायचा. नंतर पती व कुटुंबीयांनी कंपनी सुरू करण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी त्रास दिला गेला.
पैसे मिळवण्यासाठी केवळ मानसिक छळच नव्हे तर मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारची वागणूक दिली जात होती. या सगळ्याला कंटाळून तिने आत्महत्या केली. घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले. स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता. मात्र, सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. मात्र तिचा त्रास कमी झाला नाही.