उरुळी कांचन येथील धक्कादायक घटना! कपड्याच्या दुकानदाराला मारहाण करून मागितली ५० हजार रुपयांची खंडणी, घटनेने खळबळ..

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे. कपड्याच्या दुकानदाराला शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रुबाब मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानात आज शुक्रवारी (ता. ११) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सार्थक जाधव असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर ओंकार सुरेश पवार (वय – २५, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, सिद्धार्थ गोविंद कांबळे (वय-४७, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली) यांचे उरुळी कांचन येथे रुबाब मेन्स वेअर या नावाने कपड्याचे दुकान आहे. त्यांचे कपड्याचे दुकान भाचा ओंकार हा सांभाळतो.
तसेच शुक्रवारी (ता.११) साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुकानात आरोपी सार्थक जाधव हा आला आणि ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. यावेळी ओंकारने खंडणी देण्यास नकार दिला. तेव्हा सार्थकने शिवीगाळ करून दमदाटी केली.
दरम्यान, काही केले तरी ५० हजार रुपये देत नसल्याने सार्थकने ओंकारला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच दगडफेक करून दुकानाचे नुकसान केले. त्यानंतर सार्थक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी सिद्धार्थ कांबळे व ओंकार पवार यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे