पुण्यातील घटनेने खळबळ! पतीने पत्नीच्या गुप्तांगावर लिंबू पिळलं अन्…

पुणे : पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून आणि गुप्तांगावर लिंबू पिळून जादूटोणा करण्याची धमकी देत अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिंचवड परिसरात घरखर्चासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख भागातील विशाल नगर-जगताप धायगुडे वसाहतीत ही घटना ११ जून २०२४ रोजी घडली आहे.
दरम्यान, ३९ वर्षीय पीडित महिलेने ४१ वर्षीय पतीकडे घरखर्चासाठी पैशांची मागणी केली असता, त्याने तिच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला, ज्यानंतर पतीने पत्नीच्या गळ्याला कोयता लावून गंभीर इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी पीडित महिलेने पतीपासून विभक्त राहण्याचा आणि घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, १ जून रोजी पतीने घरातील वस्तू हलवल्या होत्या. पीडिता मुलांचे कपडे व पुस्तके आणण्यासाठी फ्लॅटवर गेली असता, मद्यधुंद पतीने तिला शिवीगाळ करत घरात कोंडून घेतले. त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि घटस्फोटाची नोटीस मागे घेण्यासाठी दबाव टाकला.
दरम्यान, केवळ मारहाण आणि अत्याचारावरच पती थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या गुप्तांगावर हळद-कुंकू लावून लिंबू पिळले. असे करून तो तिच्यावर जादूटोणा करेल, अशी भीती त्याने घातली. या संपूर्ण प्रकारानंतर अत्यंत घाबरलेल्या पीडित महिलेने अखेर पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.