पुण्यात धक्कादायक प्रकार! रात्री शांत झोपले, सकाळी उठून मोबाईल पाहिला अन् खात्यातून गायब झाले लाखो रुपये

पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरातून सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीचं जेवण करून गाढ झोपलेल्या ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून मध्यरात्री तब्बल पावणेदहा लाख रुपये गायब झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या ज्येष्ठ नागरिकाने कोणालाही ओटीपी दिला नव्हता किंवा संशयास्पद लिंकवर क्लिकही केले नव्हते. तरीही त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. दिवसभराचं काम आटोपून ज्येष्ठ नागरिक झोपले असताना त्यांच्या बँक खात्यातून काही मिनिटांत एकापाठोपाठ एक व्यवहार झाले. या व्यवहारांद्वारे खात्यातील जवळपास पावणेदहा लाख रुपये दुसऱ्या खात्यांमध्ये वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


ही रक्कम संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी भविष्यासाठी साठवून ठेवली होती. मात्र, सकाळी झोपेतून उठल्यानंतर मोबाईलवरील बँक व्यवहारांचे संदेश पाहून त्यांना मोठा धक्का बसला. खात्यातून मोठी रक्कम गायब झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला आणि खाते गोठवण्याची प्रक्रिया केली.
ना ओटीपी, ना लिंक; तरीही खात्यातून पैसे गायब!
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित नागरिकांनी कोणालाही ओटीपी किंवा पासवर्ड दिल्याचं समोर आलेलं नाही. तसेच त्यांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक केल्याचंही सांगितलेलं नाही. त्यामुळे पैसे नेमके कसे काढण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राथमिक तपासात मोबाईलवरील रिमोट अॅक्सेस किंवा मालवेअरच्या माध्यमातून बँक खात्याशी संबंधित माहिती अथवा व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्यात आलं असण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र, फसवणुकीची नेमकी पद्धत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
सहकारनगर पोलिसांकडून तपास सुरू
घटनेनंतर ज्येष्ठ नागरिकांनी सहकारनगर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस आणि सायबर सेलच्या माध्यमातून सुरू असून, पैसे कुठे वळवण्यात आले आणि या फसवणुकीमागे कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या नव्या पद्धतींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी मोबाईलमध्ये अनोळखी अॅप्स इन्स्टॉल करणं टाळावं, संशयास्पद परवानग्या देऊ नयेत आणि बँक खात्यातील व्यवहारांचे संदेश नियमित तपासावेत, असं आवाहन करण्यात येत आहे.
