खत खरेदीसाठी आता क्यूआर कोड अनिवार्य? २२ ऑक्टोबरपासून नवा नियम, शेतकऱ्यांनी आधीच जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!


पुणे : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी, कृत्रिम टंचाईला आळा घालण्यासाठी आणि खतांसोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती थांबवण्यासाठी खत विक्री प्रक्रियेत मोठा बदल करण्यात येत आहे. २२ ऑक्टोबरपासून खत विक्रीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) ही डिजिटल प्रणाली लागू होत असून, शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यापूर्वी मोबाइलवर नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीनंतर मिळणाऱ्या क्यूआर कोडच्या आधारेच अधिकृत कृषी सेवा केंद्रातून खत खरेदी करता येणार आहे.

नव्या व्यवस्थेमुळे खतांची मागणी आणि विक्री यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, खत खरेदी करण्यापूर्वी नोंदणी कशी करायची, कोणती माहिती भरायची आणि क्यूआर कोड किती काळ वापरता येणार, हे शेतकऱ्यांना समजून घेणे आवश्यक आहे.

मोबाइलवर अशी करा खत खरेदीसाठी नोंदणी

सर्वप्रथम शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत एफएफएस अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅपमध्ये राज्याची निवड केल्यानंतर आधार प्रमाणीकरण किंवा शेतकरी ओळख क्रमांकाच्या मदतीने प्रवेश करता येईल. यासाठी एकवेळ संकेतांकाची (ओटीपी) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

त्यानंतर शेतकऱ्यांना स्वतःच्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीची माहिती भरावी लागेल. यामध्ये जिल्हा, तालुका, गाव आणि सर्वे क्रमांक यांचा समावेश असेल. तसेच, शेतात कोणते पीक घेतले आहे, याची नोंद करावी लागणार आहे.

पीक आणि खत वापराच्या शिफारशी लक्षात घेऊन आवश्यक खताचा प्रकार तसेच किती पिशव्या खरेदी करायच्या आहेत, याची निवड करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला टोकन क्रमांक आणि क्यूआर कोड मिळेल.

क्यूआर कोड फक्त ७२ तासांसाठी वैध

खत खरेदीसाठी मिळणाऱ्या क्यूआर कोडची वैधता केवळ ७२ तास असणार आहे. या मुदतीत शेतकऱ्याला निवडलेल्या विक्रेत्याकडे जाऊन कोड दाखवावा लागेल. विक्रेता क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर खत देईल आणि व्यवहाराची पावती उपलब्ध करून देईल.

महत्त्वाचे म्हणजे, ७२ तासांच्या आत खत खरेदी पूर्ण झाली नाही, तर शेतकऱ्याला पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे खतांची गरज, पिकाची अवस्था आणि उपलब्धता लक्षात घेऊनच नोंदणी करणे आवश्यक ठरेल.

शेतकऱ्यांसाठी काय बदलणार?

या डिजिटल व्यवस्थेमुळे खत विक्रीतील अनियमितता, साठेबाजी आणि खतांसोबत अन्य उत्पादने घेण्याची सक्ती कमी करण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना जमिनीचा तपशील, पीक आणि खतांची आवश्यकता यांची अचूक माहिती भरावी. तसेच, क्यूआर कोड मिळाल्यानंतर त्याची मुदत लक्षात ठेवून खरेदीचे नियोजन करावे.

खत खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी ही नवी व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात खत घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर जाण्यापूर्वी मोबाइलवरील नोंदणी आणि क्यूआर कोड ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!