पुण्यात धक्कादायक घटना! कडक उन्हात परिसर सुनसान; चुलत भावानेच साधली संधी, घरात घुसला, मग..


पुणे : नात्यांमधील विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात उघडकीस आली आहे. घरातीलच व्यक्तीने संधी साधत चुलत भावाच्या घरात चोरी केल्याचा प्रकार समोर आला असून, सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे.

मनोहरनगर परिसरात सोमवारी (दि. ११) ही घटना घडली. सूरज विजयकुमार गायकवाड आणि त्यांची पत्नी सकाळी कामासाठी घराबाहेर गेले होते. सकाळी ६ ते दुपारी २ या कालावधीत घर बंद असल्याची माहिती आरोपीला मिळाली. याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश करून कपाटातील मौल्यवान ऐवजावर हात साफ केला.

या प्रकरणात उत्तम गायकवाड (वय ४०, रा. मोरखंडी, जि. बिदर, कर्नाटक) याच्यावर आरोप करण्यात आला आहे. आरोपी हा फिर्यादी सूरज गायकवाड यांचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने परवानगी न घेता घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

कामावरून घरी परतल्यानंतर घरातील सामान विस्कळीत अवस्थेत दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सूरज गायकवाड यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

घरातील परिचित व्यक्तीकडूनच चोरी झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, घर सुरक्षित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मजबूत कुलूप व्यवस्था आणि शेजाऱ्यांशी सतत संपर्क ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!