नाशिकमध्ये खळबळ! 18 तास घरात मृतदेह ठेवला, मग कसारा घाटात नेऊन फेकला; अखेर हत्येचा उलगडा

नाशिक : नाशिकमधून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. 40 वर्षीय वसंत गोरखनाथ सातपुते यांची त्यांच्या लिव्ह-इन पार्टनरने मित्राच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे.
हत्येनंतर मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवण्यात आला आणि त्यानंतर कारमधून कसारा घाटात नेऊन फेकल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हसिना शेख आणि वसंत गोरखनाथ सातपुते हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये काही कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या वादातून हसिना हिने मित्र साहिल शहा याच्या मदतीने सातपुते यांची घरातच हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.


हत्येनंतर मृतदेह तातडीने घराबाहेर नेण्यात आला नाही. तो तब्बल 18 तास घरातच ठेवण्यात आला. त्यानंतर कारमधून मृतदेह कसारा घाटाच्या दिशेने नेण्यात आला आणि तेथे तो फेकून संशयित मुंबईच्या दिशेने परतल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही पोलिसांना संशय आहे. घरातील रक्ताचे डाग पुसण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर संशयित मुंबईत फिरत असल्याचेही समोर आले.
सुरुवातीला या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर तपास सुरू करण्यात आला. हसिना शेख, तिचा मित्र साहिल शहा आणि त्यांच्या साथीदारांनी कारमधून मृतदेह नेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कसारा घाटात शोधमोहीम राबवली. त्यानंतर मृतदेह सापडला आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया करण्यात आली. मृत व्यक्ती वसंत गोरखनाथ सातपुते असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी हसिना शेख आणि साहिल शहा यांना अटक केली असून मोईन शहा यालाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तिघांची चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास केला जात आहे.
प्राथमिक तपासानुसार, वसंत सातपुते हे हसिना यांच्याकडील पैसे घेत असल्याचा आरोप आहे. तसेच त्यांना मद्यपान आणि जुगाराची सवय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे.
सातपुते हे हसिना यांना शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याने त्या त्रस्त होत्या, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर मित्राच्या मदतीने हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.