अजित पवारांना धक्का ; प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर रुपाली पाटलांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, नवा पक्षही ठरला?

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुण्यात रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील हा राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आले आहे त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील ठोंबरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीन पक्षांकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती आहे. रूपाली पाटील यांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र केला तर निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे.काही काळापूर्वीच रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले होते. अंतर्गत वादाला कंटाळून त्यांनी मनसेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्या राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीकडून नुकतीच पक्षाच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात रुपाली पाटलांसह अमोल मिटकरी यांचीही उचलबांगडी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अजित पवार यांनी त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे रूपाली पाटील या उद्या अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

