“उद्या मला काही केलं तर?” सायली पाटीलला धमक्यांचे फोन; मुलीला मारण्याचीही धमकी, नृत्यांगनेने मागितले पोलीस संरक्षण


पुणे : कार्यक्रमात निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा मुद्दा सोशल मीडियावर मांडणे प्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटीलला महागात पडल्याचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातील वडझरी गावात नवरात्रोत्सवादरम्यान झालेल्या कार्यक्रमानंतर तिने जेवणाच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करणारा व्हिडीओ प्रसारित केला. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप सायलीने केला आहे. याप्रकरणी तिने पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

अंघोळीच्या पातेल्यात पोहे दिल्याचा आरोप

सायलीच्या म्हणण्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी बीडमधील वडझरी येथे तिचा कार्यक्रम होता. मागील वर्षीही याच ठिकाणी जेवणाची गैरसोय झाल्याचा तिचा दावा आहे. यंदा आयोजकांना आधीच जेवणाची योग्य व्यवस्था करण्यास सांगितले होते. काही कलाकारांचे उपवास असल्याने त्यांच्यासाठी चहा, तर इतरांसाठी पोहे देण्याची अपेक्षा होती. मात्र, अंघोळीच्या पातेल्यात पोहे दिल्याचे तिने सांगितले. जेवणाच्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करत ती आणि तिच्यासोबतचे १७ ते १८ कलाकार जेवण न करताच कार्यक्रमासाठी गेले. नंतर त्यांनी एका टपरीवर मॅगी खाल्ली, असेही तिने सांगितले.

व्हिडीओ हटवण्यासाठी दबाव?

या प्रकारानंतर सायलीने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत वडझरीत पुन्हा कार्यक्रम करणार नसल्याचे म्हटले. त्यानंतर आयोजकाचा फोन आला आणि व्हिडीओ हटवला नाही तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तिने केला. कराडमधील कार्यक्रमात २० ते २५ जण पाठवून कार्यक्रम बंद पाडण्याची धमकीही मिळाल्याचे सायलीने सांगितले.

मुलीच्या वाढदिवसाचा उल्लेख करत धमकी

सायलीच्या दाव्यानुसार, एका व्यक्तीने तिच्या मुलीच्या वाढदिवसाला ती आली नाही तर मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच, तिला पुण्यात फिरू देणार नसल्याचेही सांगण्यात आले. धमक्यांचे अनेक फोन येत असल्याने भीती वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.

“गावाची बदनामी करायची नव्हती”

“मीही शेतकऱ्याची मुलगी आहे. मला गावाची बदनामी करायची नव्हती; मात्र पाहुण्यांना योग्य वागणूक आणि जेवण मिळायला हवे,” अशी भूमिका सायलीने मांडली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्याचे सांगत, संरक्षण मिळाल्याशिवाय बाहेर फिरणार नसल्याची भीतीही तिने व्यक्त केली. “उद्या मला काही केलं तर काय सांगता येत नाही,” असे म्हणत तिने आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सायलीने केलेल्या आरोपांवर आयोजकांची बाजू आणि पोलिसांच्या तपासाबाबतची अधिकृत माहिती समोर येणे अद्याप बाकी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!