शिवसेना नेते अशोक धोडी हत्या प्रकरणी भयंकर माहिती आली समोर, ‘या’ धक्कादायक कारणासाठी झाली हत्या…

मुंबई : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे. गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात ४० फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला आहे.

पोलिसांनी त्यांची गाडीही शोधून काढली. प्रारंभिक तपासानुसार, अशोक धोडी यांचा अपहरण करून त्यांची हत्या त्यांच्या लहान भावानेच केली, असे उघड झाले आहे. तसेच त्यांची गाडीही आढळून आली. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच काही साथीदारांसोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं उघड झाले आहे.
अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी आणि त्याचे साथीदार हे दारू तस्करीच्या अवैध धंद्यात सामील होते. अशोक धोडी त्यांच्या या धंद्यात अडचण बनल्याने अविनाश आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचे अपहरण केले आणि नंतर हत्या केली. मृतदेह फेकण्यासाठी आरोपी गुजरात गाठले होते.

तसेच पालघर पोलिसांनी सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह आणि गाडी बाहेर काढली. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी अविनाश धोडी आणि इतर तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पालघर पोलिसांनी तात्काळ फरार आरोपींवर कारवाई सुरू केली आहे, आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठीही अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत आहेत.
