Shirur : बिडी पित असताना घडलं विपरीत! लुंगीला आग लागल्याने ज्येष्ठाचा होरपळून मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना…

Shirur : पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरात बिडी पिण्याचे व्यसन असलेला एक ज्येष्ठ नागरिक बिडी पीत असताना अचानकपणे त्यांच्या लुंगीला आग लागली. आग लागल्यामुळे ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात ४ डिसेंबर रोजी घडली आहे.
छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय. ८५ वर्षे, रा. डंबेनाला, ता. शिरुर, जि. पुणे) असं मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत हमीद छोटूभाई शेख यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर येथील डंबेनाला परिसरात छोटूभाई शेख राहण्यास आहेत. त्यांना बिडी पिण्याचे व्यसन असल्याने ते ४ डिसेंबर रोजी त्यांच्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसून बिडी पेत बसले होते. त्यावेळी त्यांच्या लुंगीला अचानकपणे आग लागली.
यावेळी त्यांच्या घरातील व्यक्तींनी पाण्याने आग विझवत त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, ५ डिसेंबर रोजी छोटूभाई शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.