Shirur News : घोडगंगा कारखान्याविरोधात एल्गार, विरोधक स्वाभिमानाची पदयात्रा काढणार….
Shirur News : गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद आहे. यामुळे आमदार अशोक पवार यांच्यावर टीका होत आहे. त्यांनी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे वातावरण तापलं आहे.
कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवारांनी कर्ज मिळून दिले नाही, असा आरोप अशोक पवार करत आहेत. याबाबत आता खरी माहिती सर्वांना माहीत व्हावी म्हणून (दि.२२) सप्टेंबरपासून लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा पदयात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती घोडगंगा कारखाना माजी संचालक सुधीर फराटे यांनी दिली.
याबाबत सुधीर फराटे म्हणाले की, स्व. बाबुराव पाचर्णे स्मृतीस्थळ येथे सर्व सभासद व महायुतीचे कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये दि. २२ सप्टेंबरपासून तालुक्यात पदयात्रा सुरु करणार आहे. २०० किमी पायी चालत घोडगंगाची कागदोपत्री पुराव्यानिशी खरी वस्तुस्थिती मांडणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी काळे म्हणाले की, निष्ठावान म्हणून सध्या सर्वत्र आमदार अशोक पवार प्रचार करीत आहेत. १९८५ साली शरद पवार यांचे उमेदवार बापूसाहेब थिटे यांच्या विरोधात काम कोणी केले. १९९० साली शरद पवार यांचे उमेदवार बापूसाहेब थिटे यांच्या विरोधातील संभाजी काकडे यांचे काम कोणी केले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. Shirur News
तसेच १९९५ साली पोपटराव गावडे यांच्या विरोधात बाबुराव पाचर्णे यांना कुणी उभे केले. १९९७ साली शरद पवार व अजित पवार यांच्या पॅनल विरोधात पॅनल कुणाचा होता. या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचारून पहा म्हणजे निष्ठा कळेल, असेही ते म्हणाले.
यावेळी दादा पाटील फराटे म्हणाले, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लोकांवर आरोप करायचे. एका पंचवार्षिक निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या वेळी बाबुराव पाचर्णे व आता अजित पवार. मुळात घोडगंगा कारखान्याने अनेक पुरस्कार मिळवले असताना नफ्यात चालण्याऐवजी कर्ज मागण्याची वेळच का आली, याचे उत्तर सभासदांना दिले पाहिजे,
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिवसेनेचे रामभाऊ सासवडे, अनिल काशिद, राजेंद्र कोरेकर, राहुल पाचर्णे, मयूर थोरात, अनिल बांडे, सचिन मचाले, संतोष नागवडे यांनीही घोडगंगा कारखान्याची सत्य परिस्थिती मांडली.