शिंदे गटाच्या आमदाराची प्राचार्यांना मारहाण ! व्हिडिओ व्हायरल…!

हिंगोली : आपल्या अरेरावीमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा आणखीन एक मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर हे मारहाण करत असताना दिसत आहेत. केवळ आमदार संतोष बांगरच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्राचार्यांचा कान पकडत त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
डॉ. अशोक उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप यावर अधिकृतरित्या स्पष्टीकरण आलेले नाही.
बांगर यांनी यापूर्वीही पोलिस कर्मचारी तसेच काही अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व मारहाण केल्याचे समोर आले होते.
विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बांगर यांना समज देण्याविषयी सांगितले होते. दरम्यान बांगर यांनी प्राचार्यांना मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.