घराच्या छतावर गेली, केबलला हात लागला आणि भयंकर घडलं! मुलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : याठिकाणी विजेचा धक्का लागून सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना खुलताबाद तालुक्यातील मोठीअळी इथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. अतिशय हुशार असलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत तपास सुरु आहे.
याबाबत माहिती अशी की, घरावरून गेलेल्या ११ के व्ही विद्युत तारेवर पडलेली केबल ओढण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना घडली आहे. राणी सोमनाथ घोरपडे, असं विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. राणीचे वडील सोमीनाथ घोरपडे हे मोठीअळी परिसरामध्ये भाड्याच्या खोलीत कुटुंबासह राहतात.
संध्याकाळच्या सुमारास राणी घराच्या छतावर गेली होती. ११ केव्हीच्या तारेवर पडलेली केबल वायर ओढण्याचा तिने प्रयत्न केला. याचवेळी विजेचा शॉक लागून राणी छतावर कोसळली. मात्र लगेच ही बातमी घरच्यांना समजली नाही. काही वेळाने मुलगी घराच्या छतावर निपचित पडल्याचं आढळल्यानंतर तिला तात्काळ खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांकडून तिला मृत घोषित करण्यात आले. राणी खुलताबाद येथील मराठी माध्यमिक शाळेत नववीच्या वर्गात शिकते. राणी शाळेमध्ये अभ्यासात हुशार होती. राणीच्या निधनाने संपूर्ण गावात गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे. लेकीच्या जाण्याने घोरपडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अचानक ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याआधीही विजेच्या धक्क्याने, शॉक लागून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. अनेकदा प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळेही सर्वसामान्यांना आपला जीव गमवावा लागल्याचंही समोर आलं आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे.