शरद पवारांचा पठ्ठ्या हातात बंदूक घेऊन सीमेवर जाण्यास तयार!! तरुणांची फौजही तयार केली….

सोलापूर : भारत- पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने सुरू केलेल्या हल्ल्यानंतर भारताने जोरदार उत्तर दिले असून यामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. असे असताना भारतीय सेनेला बॅकअप फोर्स पुरवण्यासाठी शरद पवारांचा एक आमदार सज्ज झाला आहे.
तरुणांची मोठी फौज संघटीत करण्यास सुरुवात केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे तरुण आमदार अभिजीत पाटील यांनी सध्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून तरुणांची फौज बनवण्याचे काम हाती घेतले आहे. आपण सैन्याला कोणतीही मदत देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
छत्रपतींचे मावळे भारतीय सैन्य दलाला सर्व प्रकारची बॅकअप रसद पुरवतील, असे पाटील यांनी सांगितले आहे. ज्या पद्धतीने वारंवार पाकिस्तानकडून आपल्या बांधवांवर दहशतवादी हल्ले होतात याचा कायमचा बिमोड करायची वेळ आता आली आहे. यासाठी सर्व तरुणाई उत्सुक असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
तसेच सैन्य दलाला लागणारे अन्नधान्य रक्त किंवा कोणत्याही प्रकारची मदत आम्ही तरुण पुरवणार असून सरकारने आमच्या हातात हत्यार दिल्यास सीमेवर जाऊन लढण्याची आमची तयारी असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आम्ही छत्रपतींचे मावळे असून आज देशाला आणि सैन्याला तरुणाची गरज असताना आम्ही त्यासाठी सज्ज आहोत, यासाठी अनेक तरुण आमच्यासोबत एकत्र येत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. या मोहिमेत सोलापूर जिल्ह्यासह राज्यातून अनेक तरुण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.