शरद पवारांचा मोठा डाव! 10 ‘शिलेदार’ मैदानात; आव्हाडांसह कुणाला मिळाली संधी?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपली नवी प्रवक्त्यांची टीम जाहीर केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर तब्बल 10 नेत्यांवर पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या यादीत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश असल्याने पक्षाच्या पातळीवर या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाने जाहीर केलेल्या नव्या यादीत जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला या दहा जणांना स्थान देण्यात आलं आहे. राज्यातील राजकीय प्रश्नांपासून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांपर्यंत पक्षाची अधिकृत बाजू मांडण्याची जबाबदारी या प्रवक्त्यांवर असणार आहे.

दरम्यान, या निर्णयापूर्वी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार अॅड. अशोकबापू पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.


विशेष म्हणजे, ऑगस्टच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रवक्त्यांच्या नियुक्त्यांबाबत मोठा निर्णय घेतला होता. 4 ऑगस्टपासून यापूर्वी पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. त्या काळात माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडतील, असं स्पष्ट करण्यात आलं होतं.
आता नव्या दहा प्रवक्त्यांची नियुक्ती झाल्यामुळे पक्षाच्या माध्यमांमधील संवादाची जबाबदारी पुन्हा व्यापक स्वरूपात विभागली गेली आहे. विविध विषयांवर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी अनुभवी नेत्यांसोबत इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी पक्षांवर टीका, सामाजिक प्रश्न आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अधिक ठामपणे समोर येण्याची शक्यता आहे.
नव्या प्रवक्त्यांची घोषणा ही केवळ पदांची नियुक्ती नसून पक्षाच्या संघटनात्मक आणि माध्यमविषयक रणनीतीतील बदल म्हणूनही पाहिली जात आहे. त्यामुळे या दहा शिलेदारांकडून पक्षाची भूमिका कोणत्या पद्धतीने मांडली जाते आणि आगामी राजकीय वातावरणात त्यांची भूमिका किती प्रभावी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.