शरद पवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, आंबेगाव दूध भेसळ प्रकरणाला नवं वळण; आरोपांवर वळसे पाटलांचा 100 कोटींच्या दाव्याचा इशारा

पुणे : राज्यात दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या धाडसत्रामुळे आंबेगाव तालुक्यातील प्रकरण चर्चेत आले आहे. या कारवाईनंतर दूध भेसळीच्या प्रकरणाचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याशी जोडत काही राजकीय विरोधकांनी गंभीर आरोप केले. वळसे पाटील हेच या प्रकरणाचे ‘मास्टरमाईंड’ आणि ‘आका’ असल्याचा आरोपही करण्यात आला. आता या आरोपांवर वळसे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ रोखण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत विविध जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रे, डेअरी तसेच दूध प्रक्रिया करणाऱ्या युनिट्सची तपासणी आणि छापेमारी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातही प्रशासनाकडून अशीच कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर स्थानिक पातळीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.

या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईबाबत आपण पहिल्याच दिवशी भूमिका मांडली होती, असे त्यांनी सांगितले. कोणतीही व्यक्ती मोठी असो किंवा छोटी, दूध भेसळीसारख्या प्रकारात दोषी आढळल्यास तिला पाठीशी घालण्याची आपली भूमिका नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील काही नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र दिले होते. दूध भेसळ प्रकरणाची कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती.
या पत्राची दखल घेत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आंबेगावमधील दूध भेसळ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे वळसे पाटील यांनी स्वागत केले. या प्रकरणात आपण कोणालाही पाठीशी घातलेले नाही, हे निष्पक्ष चौकशीमधून स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला.
मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर काही लोकांनी आपल्याला या संपूर्ण प्रकरणाशी जोडले आणि आपणच दूध भेसळीचे ‘मास्टरमाईंड’ व ‘आका’ असल्याचे आरोप केले, असे वळसे पाटील यांनी सांगितले. अशा वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
याप्रकरणी आता वळसे पाटील यांनी मोठी कायदेशीर घोषणा केली आहे. चुकीची आणि बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरोधात १०० कोटी रुपयांचा दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वकिलांसोबत चर्चा झाली असून मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित व्यक्तींना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात येत असल्याची माहितीही वळसे पाटील यांनी दिली. तसेच, ज्यांनी आपल्याविरोधात चुकीची वक्तव्ये केली आहेत, त्यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
त्यामुळे आंबेगावातील दूध भेसळ प्रकरणावरून सुरू झालेला राजकीय वाद आता १०० कोटींच्या कायदेशीर दाव्यापर्यंत पोहोचला आहे. शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, एफडीएची कारवाई आणि त्यानंतर वळसे पाटलांचा कायदेशीर कारवाईचा निर्णय यामुळे या प्रकरणाची पुढील घडामोड काय असणार, याकडे आता लक्ष लागले आहे.