निवृत्तीच्या चर्चांना शरद पवारांचं कृतीतून उत्तर! थेट बारामतीत पोहोचून केलं असं काही…

बारामती : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनेक राजकीय नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, आता बारामतीतील गोविंद बागेत शरद पवार यांनी केलेल्या एका कृतीमुळे या चर्चांना पुन्हा वेगळे वळण मिळाले आहे.
शरद पवार यांनी गोविंद बागेतील आपल्या शेतात जाऊन उसाच्या पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे, या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उसाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या १५ वर्षांपासून या शेतात प्रति एकर सुमारे ६० टन उसाचे उत्पादन मिळत होते. मात्र, AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर हे उत्पादन दुप्पट होऊन प्रति एकर १२० टनांपर्यंत पोहोचले आहे. शरद पवार यांनी या प्रयोगाची माहिती घेत आधुनिक शेतीची पाहणी केली.

निवृत्तीच्या चर्चांदरम्यान शरद पवार यांनी शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानातील प्रयोगांमध्ये घेतलेला सहभाग चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या भेटीमुळे ते विविध क्षेत्रांतील कामात सक्रिय असल्याचे पुन्हा दिसून आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली होती प्रतिक्रिया
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पवार यांच्या सक्रियतेचा उल्लेख केला होता.
“शरद पवार यांना उत्तम आरोग्य लाभावं, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. पवार साहेब आजही सक्रिय आहेत. ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि कामांमध्ये रस घेत असतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य होणार नाही. आपल्या आयुष्यात ते कधीही थांबणार नाहीत. ते नेहमी काही ना काही सकारात्मक करत राहतील,” असे फडणवीस म्हणाले होते.
