पुणेकरांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार? १ डिसेंबरला म्हाडाच्या हजारो घरांची सोडत; महत्त्वाची अपडेट आली समोर


पुणे : हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून तब्बल ४ हजार ४६२ घरांसाठी १ डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीची प्रारूप पात्रता यादी जाहीर झाली असून तब्बल २ लाख ६८ हजार ६७० अर्जदार पात्र ठरले आहेत. तर ५ हजार ३९८ अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अंतिम यादी आणि सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.

म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत घरांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या योजनेत पुणे महापालिका क्षेत्रातील १,४६८, पिंपरी-चिंचवडमधील १,४०६ आणि पीएमआरडीए क्षेत्रातील १,५८८ घरांचा समावेश आहे. याशिवाय मागील दोन सोडतींमध्ये शिल्लक राहिलेल्या ५५८ घरांचाही या सोडतीत समावेश करण्यात आला आहे.

या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तब्बल ३ लाख २५ हजार ७७ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी प्रत्यक्ष सोडतीत सहभागी होण्यासाठी २ लाख ७४ हजार ४०८ अर्जदारांनी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, छाननीदरम्यान ५ हजार ३९८ अर्ज अपात्र ठरले. यामध्ये उत्पन्नाचा चुकीचा दाखला सादर करणाऱ्या अर्जदारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. संबंधित अर्जदारांना योग्य कागदपत्रे सादर करण्यासाठी एक दिवसाची मुदतही देण्यात आली होती.

दरम्यान, या सोडतीची अंतिम पात्रता यादी शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर १ डिसेंबर रोजी घरांची सोडत काढण्यात येईल. त्यामुळे या सोडतीत आपले घराचे स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता हजारो अर्जदारांना लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!