Sharad Pawar : शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, लोकसभेला आपल्याला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, पण, ‘या’ कारणासाठी माघार घेतली…
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. पण त्यावेळी महाविकास आघाडीचे ऐक्य टिकून राहावे, यासाठी मी दोन पावलं मागे आलो, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार यांनी आजच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या. परंतु, महाविकास आघाडीची एकी कायम राहावी, यासाठी मी दोन पावलं मागे आलो.
आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. उद्यापासून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे, याची तयारी ठेवा. त्यासाठी लोकांची जास्तीत जास्तं काम करा.
राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही. राज्यात जास्त प्रश्न असतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. Sharad Pawar
शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागावाटपावेळी काय घडणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवून दिली आहे.
शरद पवार यांचे हे वक्तव्य पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत मविआच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेईल, असे संकेत मिळत आहेत.