सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात शाहरूख खानचा जलवा! रेवतीसोबत डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल

मुंबई : माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा लग्नसोहळा सध्या सुरू आहे. त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्यांच्या लग्नाला बड्या बड्या दिग्गजांनी उपस्थिती लावली. अगदी बॉलिवूडचा किंग शाहरूख खानही त्यांच्या लग्नसोहळ्याला आला आणि त्याने सोहळ्याला चारचाँद लावले.
सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळे ही लखानींच्या घरची सून झाली आहे. नागपूरचे प्रसिद्ध बिझनसमन अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानीसोबत तिने लग्नगाठ बांधली. आज 20 जून रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्यात शाहरूखने आपली जादू दाखवली.

शाहरुख खान १९९८ मधील ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘कोई मिल गया’ या गाण्यावर रेवती आणि इतरांसोबत डान्स करताना एका व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख त्याची प्रसिद्ध आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. रेवतीने शाहरुखला आलिंगन दिल्याचेही पाहायला मिळाले.

मुंबईत आयोजित संगीत समारंभासाठी शाहरुखने पारंपरिक भारतीय वेशभूषेचा आधुनिक अवतार निवडला. त्याने पूर्ण काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. आधुनिक ‘बंदगळा’ किंवा ‘शेरवानी-स्टाईल ब्लेझर’शी साधर्म्य दर्शवणारे जॅकेट शाहरुखने घातले होते.
सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी हे नागपुरातील विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. विधान परिषदेच्या चंद्रपूर वर्धा गडचिरोली मतदारसंघासाठी ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उमेदवार आहेत.
त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. रेवती सुळे नागपूरची सून होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची माहिती आहे.